|| जय मल्हार ||

।। माळेगाव यात्रा ।।

जिल्हा परिषद, नांदेड

शुभेच्छा संदेश

मा. जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी, नांदेड

नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माळेगाव या गावी मार्गशीर्ष अमावस्येला खंडोबाची मोठी यात्रा भरते. दक्षिण भारतातील मोठी आणि प्रसिद्ध यात्रा म्हणून गणल्या जाते. नांदेड जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, मन्याड, वैनगंगा, आसना या नद्यांनी ग्राम संस्कृती अधिक समृद्ध केली आहे. माळेगाव यात्रा हे गाव मन्याड खोऱ्यातील ग्रामीण वारसा जपणारे गाव आहे. प्रतिवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रात इतरत्र भरणाऱ्या यात्रांपेक्षा माळेगावच्या खंडोबाची यात्रा ही मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. आंध्र कर्नाटक सीमावर्ती प्रदेशातील अनेक लोक या यात्रेसाठी येतात . जिल्हा परिषदेच्यावतीनेही या ठिकाणी जनसामान्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारे स्टॉल मांडण्यात येतात.शासकीय जनसंवाद असणारी ही प्रदर्शनी लोकांसाठी उपयुक्त ठरते. सध्याचे युग हे माहितीचे आणि प्रसाराचे युग आहे त्यामुळे या यात्रेचा प्रचार प्रसार सर्वदूर व्हावा आणि पर्यटनानुकूल वातावरण तयार व्हावे यासाठी यात्रेविषयी माहिती असणारी पुस्तिका (कॉफी टेबल बुक) जिल्हा परिषदेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येत आहे.
-श्री अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड

मा. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नांदेड

नांदेड जिल्ह्याला एक वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ऐतिहासिक व सामाजिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्याचे स्वतःचे असे व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्र व तेलंगणाला संपन्न करणाऱ्या गोदावरीच्या नाभीस्थानात वसलेला हा जिल्हा गोदावरीच्या प्रवाहामुळे उत्तर व दक्षिण अशा दोन भागात विभागलेला आहे. नांदेड जिल्ह्याचे भौगोलिक स्थान हे महाराष्ट्रातील मराठवाडा ,विदर्भ, तेलंगणा आणि कर्नाटक यांच्या सीमारेषेवर आहे. नांदेड येथील गुरुद्वारा, माहूरची रेणुकादेवी, देगलूर मधील होट्टल, कंधारचा भुईकोट किल्ला आणि माळेगावची खंडोबा यात्रा हे येथील धार्मिक तीर्थक्षेत्रासह पर्यटनाचे सांस्कृतिक केंद्र आहेत. चारशे वर्षाची परंपरा लाभलेली माळेगावची ही यात्रा एक सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र आहे. मनोरंजन, व्यापारउदीम,जनावरांचा बाजार, भटक्यांची जातपंचायत, पशु प्रदर्शनी ,पशुंच्या धावण्याच्या स्पर्धा, बालगोपाळांसाठी खेळाची साधने अशा अनेक आयामातून ही यात्रा महत्त्वाची ठरते. शासनाच्या वतीने जिल्हा परिषद या ठिकाणी वेगवेगळ्या विभागांच्या यशोगाथांची मांडणी असणारे स्टॉल्स लावते. यातून लोकांची जाणीव जागृती होते. यात्रेच्या निमित्ताने संवाद घडून येतो. या समग्र घटनांचे लेखन चित्रीकरण असलेली पुस्तिका (कॉफी टेबल बुक) नांदेड जिल्हा परिषद या यात्रेच्या औचित्याने प्रसिद्ध करीत आहे. महाराष्ट्राबाहेर या यात्रेची नव्याने ओळख व्हावी आणि पर्यटनाची दारे मोठ्या प्रमाणात खुली व्हावीत यासाठी हे प्रयोजन आहे. -मिनल करनवाल
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नांदेड श्री अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड