|| जय मल्हार ||

।। माळेगाव यात्रा ।।

जिल्हा परिषद, नांदेड

सांस्कृतिक परंपरा

माळेगावच्या प्रसिद्ध यात्रेत उबदार कपड्यांच्या बाजार

थंडीपासून बचाव करणारे स्वेटर, जॅकेट, कान टोपी, हातमोजे, शाल, चादरी, सतरंजी, रग, घोंगडी, लोकरीचे कपडे या सर्व वस्तूंची दुकाने यात्रेत थाटण्यात आली असून नांदेड रोड, लातूर रोड, जुना वळण रस्ता, पोलीस चौकी रस्ता, घोडा मार्केट, विश्रामगृह परिसर या सर्व ठिकाणी ही बाजारपेठ फुलतो. माळेगाव यात्रेत इतर कोणत्याही वस्तूंच्या दुकानापेक्षा उबदार कपड्यांचे दुकाने खूप असतात. तसेच या लोकरी कपड्यांच्या बाजारात मिळणाऱ्या कपड्यांच्या किमती या रिटेलच्या दुकानांमध्ये मिळणाऱ्या कापडांच्या तुलनेत फारच कमी असतात. म्हणून हिवाळ्यातील थंडीपासून बचावासाठी मोठ्या संख्येने नागरिक या दुकानावर गर्दी करताना दिसतात. ही दुकाने यात्रा संपल्यावर सुध्दा काही दिवस चालु असतात.


बालकांच्या खेळणीची बाजारात गर्दी

माळेगावच्या यात्रेमध्ये लहान मुलांची व महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लहान मुलांची खेळणी मोठ्या प्रमाणात येतात. त्यावर लहान मुले मौज घेण्यामध्ये मग्न असतात. त्या खेळणी मध्ये लहान झोके, आगगाडी, मोटारी, आकाश पाळणा ही साधने येतात. तसेच तांबडा, लाल, गुलाबी, पिवळा विविध रंगाचे कुंकू बाजारात विक्री करता येतात. येथे हरमाल विक्रीची जोर खुप असतो. त्यामध्ये बांगडी, पॉकेट, बेल्ट, टिकल्या, पीना, झुमके, नथनी, पायातली चैन, बो, गळ्यातले हार, नेकलेस, कंबर पट्टा, बाजू बंध, साडी पीन, लिपिस्टिक, मेकअप बॉक्स, नेलपेंट आणि शोभेच्या नवनवीन वस्तू विक्रीसाठी येतात. हरमाल 20, 30, 40 रुपयाप्रमाणे विक्रीचे मोठ्या प्रमाणात दुकाने थाटल्यामुळे या वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात या बाजारपेठेमध्ये महिलांची गर्दी होत असते.


माळेगावात पशुधनांच्या सजावट वस्तू खरेदीसाठी झुंबड

माळेगाव यात्रेमध्ये घोडा, उंट, उंटासह इतर पशु सहभागी झालेले आहेत. यांना आवश्यक असणारे सजावटीचे साहित्य खरेदीसाठी मालकांची गर्दी ठिकठिकाणी दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे इतर जनावरांसाठी सजावटीचे साहित्य खरेदी होत आहे. घोड्यांसाठी काठी, गळ्याचा पट्टा, घुंगरमाळ, मलाकोडे, फोगीर, म्होरकी, हंटर, लगाम आणि त्याला सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी होत आहे. यात्रेत राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, चंदिगड, पंजाब मधून व्यापारी वर्ग सहभागी झाला आहे.


माळेगाव यात्रेत विविध शेती औजारांचे प्रदर्शन व विक्री

माळेगाव यात्रेत कृषि प्रदर्शनात शेती औजाराचे स्टॉल येत असून शेती औजारे खरेदीसाठी शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. शेती औजारांमध्ये खुरपणी यंत्र, आंतरमशागती करीता टीलर, गहू, सोयाबिन, साळी व कमरे एवढया उंचीच्या पिकांची कापणी करण्याकरीता सोंगणी यंत्र यात्रेकरुंचे लक्ष वेधतात. दुध काढण्याची मशीन, कडबा कुट्टी, गवत कापणी यंत्र, सायकल हात कोळपे, कडबा कुट्टी कम भरडा मशिन, कापूस पराटी श्रेडर, मिनी ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र, चायना मॉडल चाफ कटर, मिल्कींग मशिन, अॅटो पेरणी यंत्र कम वखर, हाय प्रेशर वॉशर, एअर कॉम्प्रेसर, पोर्टेबल वॉटर पंप, पॅकींग मशीन, लोखंडी बैल गाडी, मॅन्युअल टोकन यंत्र, ठिबक व अॅक्सेसरीज ग्रेव्ही मशीन, मिरची कांडप यंत्र, शेवयी मशीन, अॅटोमॅटिम कापड मशीन, धान्य क्लिनिंग मशीन इ.मशीन चे प्रदर्शन व विक्री होते.


बंजारा समाजाची परंपरागत वेशभूषा

जारा समाजाची परंपरागत वेशभूषा साहित्य यात्रेत विक्रीसाठी उपलब्ध- बंजारा समाजाची परंपरागत वेशभूषा कला व विणकाम साहित्य माळेगाव यात्रेत विक्रीसाठी येतात. पारंपारिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या बंजारा समाजातील वेशभूषाचे साहित्य माळेगावात विक्रीसाठी येतात. यामध्ये बबलू (लग्नावर व पारंपरिक खेळामध्ये वापरल्या जाणारे) कमरेची पिशवी, निवद धाळणी (निवद थाळी) कुल्या, पारंपरिक घागरा, ओढणी, कंबरपट्टा, घुंगट, कसोट्या (कमरेला लावण्यासाठी) देवाची कोतळी, शेला, तितरी, अशा अनेक पारंपारिक वस्तू विक्रीसाठी माळेगावात आणतात. गेल्या पाच वर्षापासून ही परंपरा टिकवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी या वस्तू विक्रीसाठी नेत आहेत.


माळेगाव यात्रेत भव्य पशु प्रदर्शन

माळेगाव यात्रेत पशु प्रदर्शनात विविध कुंत्र्यांच्या जातीमध्ये राँट, ब्रिलर, लाँबर डॉग आदी कुत्र्यांच्या जाती हजेरी लावतात. विविध पशूमध्ये घोडे, गाढव, उंट, कोंबडे तसेच विविध जातीचे कुत्रे पहावयास मिळाले. विविध जातींचे अश्व घोडे बाजार हे माळेगाव यात्रेचे आकर्षण आहे. येथे विविध जातीचे अश्व दाखल झाले आहेत. यात्रेत यावेळी सिंध, काठेवाड, धारवाड, पंजाब, नुकरा, स्टँलिकन, बाँडा, हुलकारी, पंचकल्याण आदी जातीचे अश्व दाखल आहेत. यावेळी अश्वांच्या विविव कवायती प्रेक्षकांना दाखविल्या जातात.


उमेदच्या माध्यमातून महिलांना मिळते हक्काची बाजारपेठ

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद नांदेड यांच्यावतीने माळेगाव येथे महिला स्वयं सहायता समूहाने बनविलेल्या उत्पादन वस्तू विक्रीचे स्टॉल उभारण्यात येतात. जिल्ह्यातील विविध विभागातून बचत गटांचे स्टॉल येथे वस्तू विक्रीसाठी लावले आहेत. यात पापड, मसाला, लोणचे, लघुउद्योग झुणका भाकर, खारोडी, दही धपाटा, शेवया, मिरची पावडर, हळद, पारंपारिक पद्धतीने बनवलेले झाडू, विणकाम, येथे कुंटूर येथील महालक्ष्मी व गिरजामाय महिला स्वयंसहायता समूहांनी मेंढीच्या केसापासून बनवलेली घोंगडी स्टॉलमध्ये मुख्य आकर्षण ठरते. घोंगडीची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. घोंगडीसह मेंढीच्या केसापासून कोट आणि मफरेल या गटाने विक्रीसाठी ठेवले जातात. विणकाम, हातमाग, शोभेच्या वस्तू, प्रकाश दिवे, बिबा गोडंबी, पायपुसणी, आसनपट्टी, रान तरोट्याची चहापत्ती, शेवग्याच्या पानाचे पापड, अशा विविध वस्तूंचे विक्री स्टॉल उभारण्यात येतात. या भव्य विक्री प्रदर्शन सोहळ्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद नांदेडच्या माध्यमातून लोकांच्या सेवेसाठी महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून करण्यात येते.